पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

वसंतराव नाईक साहेब पुण्यतिथी विशेष



पूर्वजीवन                                                        

वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. हे पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद होते. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात. माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या योजना राबवल्या. नाईक यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणूनही संबोधतात.साहित्यिक, विचारवंत एकनाथ पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. 

नाईक घराणे

नाईक घराणे हे भारतीय समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. 'स्वराज्याची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर इ. स. १९६२ पासून नाईक घराण्यानी निर्विवाद विजय संपादन केले आहे. त्यांचे मूळ आडनाव राठोड असून गोत्र रणसोत क्षत्रिय आहे. गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीनजुमला वसवून बंजारा समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले व त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली, राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. नाईक घराण्यानी महाराष्ट्राला दोन यशस्वी मुख्यमंत्री दिलेत.अविनाश नाईक व मनोहरराव नाईक यांच्यारूपाने मंत्री तर विद्यमान आमदार निलय नाईक व इंद्रनील नाईक आहे. नाईक यांच्या विकास कामावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात 'महानायक वसंतराव नाईक' म्हणून आदराने संबोधतात.

शिक्षण            

वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). विद्यार्थीदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील घाटे या ब्राह्मण कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. या विवाहामुळे उभयतांनी काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त घालवली. त्यांनी आपली वकिली गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी व त्यांना सामाजिक बांधिलकी ठेवणारे वकील म्हणून ओळखले गेले. वत्सलाताई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. त्यांची दोन्ही मुले निरंजन व अविनाश आहेत.

कारकीर्द         

 वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. देशात पहिल्यांदाच चार कृषी विद्यपिठाची स्थापना केली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.  

उद्गार

• शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, तर शेतकऱ्यांची लेकरं सुद्धा कलेक्टर झाले पाहिजेत. (वसंतराव नाईकांचे शेतीवरील भाषणे) • शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. (७जून १९७१ कॉंंग्रेस शिबीर) • शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. (वरोली, नवाटी भूमीपूजन सोहळा, १९६३) • शिक्षणाने आपल्यात माणुसकी यायला पाहिजे. समाजाप्रती कृतज्ञतेची भावना सतत मनात रहावी, ही बीजे शिक्षणातून रुजायला हवीत. (आंध्र दीक्षांत समारोह, १५ मार्च १९७०) • माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही.(अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर) • शिक्षणाचा दर्जा वाढवून नव्या युगातील क्षमता बरोबर वैज्ञानिक दृष्टी जागृत करणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मूल्ये शिक्षणातून रुजायला हवीत.( पुणे, १९६७) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.