पेज

एकच ध्यास गुणवत्ता विकास कारण आम्ही देतो गुणवत्तेची हमी !

"माझी शाळा आदर्श शाळा" या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

भारतीय राष्ट्रध्वज संहिता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारतीय राष्ट्रध्वज संहिता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ध्वजारोहण करताना या गोष्टींची काळजी घ्या


आपल्याला बरेचवेळा भारताची आन, शान आणि भारताचा मानबिंदू असलेला आपला राष्ट्रध्वज तिरंगा याच्यविषयी फारच कमी माहिती असते. राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला जातो.

राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे. संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.

कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात ध्वज आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा. राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.

कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा. संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.

कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये. राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही. घराच्या पडद्यासाठी ध्वजाचा उपयोग करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलेही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.

ज्या खांबावर ध्वज फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही. केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

२६ जानेवारी २००२ ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली. त्यानुसार ध्वजसंहितेत झालेले बदल.
१) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.
२) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.
३) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर/ कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)
४) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.

ध्वजप्रतिज्ञा - 

मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम,समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे.

ध्वजारोहन क्रम
१) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे
२) राष्ट्रीय सलामी
३) राष्ट्रगीत
४) ध्वजप्रतिज्ञा
५) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.

भारतीय राष्ट्रध्वज संहिता


भारतीय राष्ट्रध्वज संहिता [ PDF ]
👇



२००२ पूर्वी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले. त्यानुसार कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो.

तिरंगा ध्वज फडकावण्याबाबत हे आहेत १० प्रमुख नियम...

१. तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.

२. सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.

३. तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

४. तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल तर (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.

५. तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करू नये. जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही.

६. तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही.

७. एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे.

८. फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे.

९. तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.

१०. अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.

शाळेच्या बातम्या

जि.प.शाळा ,भाटंबा गाव शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा.