संयुक्त राष्ट्र संघाने १९८४ या वर्षाला “आंतरराष्ट्रीय युवा वर्ष” घोषित केले त्यानुसार मग त्याचे महत्त्व जाणून भारत सरकारने त्याच वर्षीपासून १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्यात येईल, अशी घोषणा केली.
भारतातील एक महान तत्वज्ञ, आध्यात्मिक आणि समाज सुधारक स्वामी विवेकानंद यांची आज (12 जानेवारी) जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
सळसळत्या रक्ताची तरुण पिढी खूप दमदार आहे. तरुणांमध्ये बरेच काही करून दाखवण्याची क्षमता आहे. प्रत्येक क्षेत्रात तरुण मंडळी आपला गौरव मिरवत आहेत आणि जगभरात भारताचे नाव मानाने उंचावत आहेत. आज केवळ तरुणच समाज आणि देशाचे भविष्य बदलू शकतात. कुटुंब, समाज आणि देशाची जबाबदारी तरूणांच्या खांद्यावर आहे. भारतातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या तरुणवर्गाची आहे.
देशातील विकासाला स्वत:हून वेग मिळावा यासाठी सरकार तरुणांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहे. तरुणांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांना मजबूत आणि सशक्त बनवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्येही अनेक उपक्रम राबविले जातात. कोणत्याही देशातील तरुणांना त्या देशाचा ‘भविष्यकाळातील निर्माते’ म्हटले जाते. भारताकडून शिकून आज अनेक देश आपल्या देशातील तरूणांची प्रगती व्हावी यासाठी ठोस पावले उचलत आहेत.देशाची युवा शक्ती एका महापुरुषाकडे पाहून स्वतःचा आदर्श ठरवेल तर तसा व्यक्ती स्वामी विवेकानंदांव्यतिरिक्त दुसरा कोणी नसेल.
भारतीय धर्म, योग, ध्यान, अध्यात्म, आणि मानवी विकास यांचा प्रसार खऱ्या अर्थाने जागवायचा असेल तर भारतीय तरुण तशा स्वप्नाने भारावून गेला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे जीवन हे तार्किक आणि आध्यात्मिक अनुभवाच्या कसोटीवर पारखून घडलेले आहे.
तो आदर्श समोर ठेऊन अंधश्रद्धा न पाळता, व्यसन तसेच क्षणिक सुखाच्या आहारी न जाता भारतीय युवक देशसेवेसाठी आणि धर्मासाठी झटला पाहिजे अशी भावना हा दिवस साजरा करण्यामागची आहे. तो दिवस १२ जानेवारी हा एकदम सूचक असा दिवस आहे कारण याच दिवशी स्वामीजींचा जन्म झालेला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा