कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ –
बा – बाणेदार ते स्वभावाने
बा – बारकाईने अभ्यास करणारे
सा – साधक ते बौद्ध धर्माचे
हे – हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा
ब – बदल समाजात घडवून आणणारे.
आं – आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणीला
बे – बेधडक सत्याग्रह केला चवदार तळ्याचा
ड – डगमगले नाही संकटे आल्यावर
क – कर्ते समाज उन्नतीचे
र – रचयीते भारतीय संविधानाचे..
अनेक वर्ष चार्तुवर्णावस्थेच्या नावाखाली, अन्याय सहन करणारे समाज बांधव. ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते. अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
होते अंधारलेले जीवन,
दिसत नव्हता प्रकाशाचा किरण.
पुसण्या त्यांचे अश्रू,
देण्या दीनं-दलितांना नवसंजीवन.
अवतरला एक महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव…
अशा या महामानवाचा, युगप्रवर्तकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील “महू” या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते.
आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला. यात तीळ मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांनी बी. ए., एम. ए., मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डि.लीट. अशा अनेक पदव्या संपादन केल्या.
‘मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो’, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुल्याशिवाय राहणार नाही’ असे मौलिक विचार त्यांनी सांगितले.
‘माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी, विद्यासागरच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल’ असे त्यांचे मत होते. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला.
बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पाणवट्यावर पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाड येथील चवदार तळे. तेथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी ओंजळीने पिले. त्यानंतर अनुयायांनी चवदार तळ्याचे पाणी पिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे मत होते की, दलितांच्या सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले.
भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. असे या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं? अन्यायाविरुद्ध लढावं कसं? संघर्षातून घडावं कसं? वादळात सामोर उभा राहावं कसं? आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावा कसं? हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला दाखवून दिले.
सर्वसामान्यांचे आधार,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार…
ज्या ज्ञानसूर्याने दूर केला,
दिन-दलितांच्या जीवनातील अंधार…
अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना,
वंदन करतो मी त्रिवार…
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भीम!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा